Tuesday, January 12, 2016

गुळाच्या पोळ्या

साहित्य :

सारण :

१/२ किलो गूळ
२ वाटया तीळ
४-५ tbsp खसखस
१ वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस
१/२ वाटी तेल
१ वाटी बेसन
वेलची पूड

आवरण :

२ वाटी कणिक
२-३ चमचे तेल
चिमूटभर मीठ

कृती :

१. तीळ, खोबरे आणि खसखस वेगवेगळे मंद गॅसवर भाजून घ्यावे. भाजल्यावर तीळाची चव बदलते, म्हणजे नीट भाजले आहेत की नाही ते समजेल आणि खसखस लवकर जळते म्हणून सावकाश लक्ष ठेवून भाजावी. खोबरे सोनेरी रंग येईपर्यंत भाजावे. वेगवेगळे मिक्सर मधून काढून घ्यावेत. (खोबरे आणि तीळ एकत्र करून मिक्सर मधे घालु शकतो आणि खसखस वेगळी.)
२. बेसन तेलावर भाजून घ्यावे, रंग बदलेपर्यंत भाजावे, म्हणजे कच्चे लागणार नाही.
३. गूळामधे हे सगळे पदार्थ एकत्र करायचे आहेत. त्यासाठी गूळ भांड्यात घालून कुकरमध्ये ४ शिट्ट्या कराव्यात. गूळ पाझरतो आणि पातळ होतो. गरम असतानाच त्यामध्ये वरील पदार्थ घालवेत आणि मिश्रण एकत्र करावे. वेलची पूड घालून नीट एकत्र करावे.
४. तेल कड़क गरम करून त्याचे मोहन कणकेत घालावे आणि पीठ घट्टसर मळून घ्यावे. पोळ्या करायच्या साधारण १-२ तास आधी पीठ मळून झाकून ठेवावे. मध्यम घट्ट भिजवावे.
५. दोन साधारण सारख्या मापाचे १'' कणकेचे गोळे घ्यावेत. त्यांच्या छोट्या लाट्या करून घ्याव्यात. एका लाटीवर सारण भरून दुसऱ्या लाटीने बंद करावे. हलक्या हाताने एकाच बाजूने लाटावे, जेणेकरून मिश्रण पोळीच्या कडांपर्यंत लागेल.
५. मध्यम गॅसवर दोन्ही बाजूंनी पोळी भाजावी. कधी कधी गूळ फसफसतो पण काळजीपूर्वक परतावी. गार झाल्यावर तूपाबरोबर खावी.

टीप:
१. तीळाचे प्रमाण कमी-जास्त करू शकतो. कमी तीळ घातले तर गूळ जास्त पाझरतो आणि थोड़े पोळ्या बनवतांना चिकटतो.
२. सारण आधी बनवून ठेवले तरी चालते आणि अगदी महिनाभर देखील नीट राहते, no refridgeration needed.
३. सारणामध्ये नंतर गूळ वाढवायचा असेल तर किसून घालवा.
४. खमंगपणा कमी वाटत असेल तर तीळ भाजून मिक्सरमध्ये घालून बारीक़ करून घालावेत.
५. पोळ्यांच्या कणकेत मैदा आणि बेसन देखील घालू शकतो. पोळ्या अजून खुसखुशीत होतात. २ चमचे बेसन/१/२ वाटी मैदा साधारण १ वाटी कणकेसाठी लागेल.
६. जर सारण पोळीच्या कडांपर्यंत गेले नसेल, तर लाटून झाल्यावर कातणाने बाहेरील पोळी कापून टाकावी.