Monday, October 3, 2016

व्हेजिटेबल पुलाव

साहित्य:

१-२ चमचे जिरे
१-२ तमालपत्र
२ तुकडे दालचिनी
५-६ मिरी दाणे
६-७ लवंगा
१ चमचा आल-मिरची पेस्ट
१ कांदा
२-३ वाट्या तांदूळ
१ छोटे गाजर
१/२ सिमला मिरची
१/२ वाटी चिरलेली फरसबी
२ चमचे तेल

कृती:
१. तांदूळ धुऊन चाळणीत निथळत ठेवावेत.
२. प्रथम तेलावर जिरे, तमालपत्र, दालचिनी, मिरी, लवंग १ मिनिट परतावे. थोडी आले-मिरची पेस्ट टाकावी.
३. कांदा उभा चिरुन ५ मिनिटे परतावा. गाजर-सिमला मिरची- फरसबी बारिक चिरुन घ्यावी. आवडत असल्यास मटार दाणे/कॉर्न/फ्लॉवर घालू शकतो.
४. कांदा परतल्यावर उरलेल्या भाज्या परतून घ्याव्या. ५ मिनिटे परतावे.
५. धुतलेले तांदूळ घालून ५ मिनिटे परतावे.
६. तांदुळाच्या दीड (१-१/२) पट पाणी घालावे आणि १-२ शिट्ट्या कराव्यात. जास्त शिट्ट्या करु नयेत, पुलाव जास्त शिजला तर बेचव लागतो. 

शेव पुरी मिक्स चटणी

साहित्य:

१/२ वाटी पुदिना
१/२ वाटी कोथिंबीर
२ इंच चिंच
४ चमचे गूळ
१/२ चमचे जिरे
१०-१२ खजूर
२-३ हिरव्या मिरच्या किंवा लाल तिखट
१-२ छोटे चमचे धणे-जिरे पावडर

कृती:

१. चिंच- गूळ- खजूर थोड्या वेळ पाण्यात भिजवून ठेवावे. खजूरमध्ये बिया असतील तर काढून टाकाव्यात.
२. वरील मिश्रण आणि उरलेले साहित्य एकत्र करुन मिक्सरमध्ये घालावे आणि बारिक पेस्ट करावी.

चटणी तयार!


बटाटा वडा

साहित्य:

५-६ बटाटे
२ tbsp आलं- लसूण - मिरची पेस्ट
१२-१३ कडीपत्ता पाने
चवीनुसार मीठ
१ वाटी बेसन
चवीनुसार तिखट, ओवा, हळद
१ चिमूट सोडा
तेल

कृती:
१. ५-६ बटाटे करायच्या वेळेच्या आधी (१/२ तास तरी आधी) पाणी न घालता फक्त धुऊन कुकरमध्ये ४-५ शिट्ट्या देऊन उकडावे. गार झाले की साले काढून कुस्करावे.
२. त्यात आले, लसूण, मिरची पेस्ट (नसेल तर लाल तिखटही चालते) + कडीपत्ता बारिक चिरुन mix करावे. चवीनुसार मीठ घालावे.
३. १ वाटी बेसनाच्या पीठात थोडे थोडे पाणी घालत इडलीपेक्षा थोडे पातळ पीठ करावे. त्यात आवडीप्रमाणे हळद, तिखट, मीठ, हिंग, ओवा घालावा. १ चिमूट सोडा टाकावा आणि जमत असेल तर २ चमचे तेल अगदी गरम करून टाकावे.
४. कढईत तेल चांगले गरम करुन गॅस थोडासा बारिक करावा. तयार मिश्रणाचे चपटे गोळे करुन पीठात बुडवून मध्यम गॅसवर तळावे. तळायला भज्यांपेक्षा जरा जास्त वेळ लागतो. खूप बारिक गॅसवर तळू नये.

Friday, September 30, 2016

कांदा भजी

साहित्य:

कांदा - २-३ मध्यम
बेसन पीठ - १ वाटी
हळद
तिखट
मीठ
हिंग
ओवा
१ चिमूट सोडा
तेल

कृती:

१. कांद्याचे बटाट्याप्रमाणे गोल slice करावेत.
२. चण्याच्या पीठात(बेसनात) थोडे थोडे पाणी घालत इडलीपेक्षा थोडे पातळ पीठ करावे. त्यात आवडीप्रमाणे हळद,  तिखट, मीठ, हिंग, ओवा(१-२ चमचा) घालावा.
३. किंचित अक्षरशः १ चिमूट सोडा टाकावा. जमत असेल तर २ चमचे तेल अगदी गरम करुन टाकावे(optional).
४. मग कढईत तेल चांगले गरम करुन गॅस थोडासा बारिक ठेवावा. कांदा/बटाट्याचे काप पीठात बुडवून एक एक सोडावे. दोन्ही side तांबूस होईपर्यंत परतावे.

टीप:
१. तळणीच्या तेलातून धूर यायला लागला तर गॅस एकदम बारिक करुन थोड्या वेळाने मोठा करावा.
२. कॊणताही पदार्थ (पापड सोडून) वडा/भजी/पुरी तळताना मध्यम गॅस तरी ठेवावा. खूप बारिक गॅसवर तळू नये. 

पाव भाजी

साहित्य:

३-४ tsp बटर/तेल
२५०grams फ्लॉवर
१/२ कप मटार
३-४ बटाटे
१ कांदा
१ सिमला मिरची
२-३ टोमॅटो
आलं - लाल मिरची पेस्ट - १-२ चमचे (whatever available)
पाव भाजी मसाला
लाल तिखट
मीठ
पाणी

कृती:

१. प्रथम फ्लॉवर निवडून घ्यावा. तो स्वच्छ धुऊन कुकरच्या डब्यात पाणी न घालता ठेवावा. त्याच डब्यात फ्लॉवरमध्ये मटार दाणे टाकावे.
२. दुसऱ्या डब्यात बटाटे स्वच्छ धुऊन ओलसर ठेवावे. ३-४ शिट्ट्या झाल्या की बंद करावा.
३. मग प्रथम बटर/तेलात कांदा बारिक चिरुन परतावा. आलं-मिरची पेस्ट परतावी. कांदा बारिक गॅसवर भरपूर परतावा.
४. मग सिमला मिरची बारिक चिरुन परतावी.
५. टोमॅटो बारिक चिरुन परत बराच वेळ परतावा.
६. मग थोडा थोडा मसाला टाकत फ्लॉवर, मटार टाकून ठोकत ठोकत परतावे.
७. शेवटी बटाटे कुस्करुन थोडा थोडा मसाला टाकत परतावे.
८. नंतर २-३ वाट्या पाणी घालून उकळावे.
९. आवडीप्रमाणे पाणी, तिखट, मीठ, मसाला adjust करावा.


Thursday, September 29, 2016

शेंगा भाजी (फरसबी/घेवडा/गवार/चवळी)

साहित्य :

फरसबी/घेवडा(सुरती पापडी)/गवार/चवळी
कांदा
मोहरी
जिरे
तिखट
मीठ
गूळ/साखर
धणे-जिरे मसाला किंवा गोडा मसाला

कृती:

१. भाजी बारीक चिरुन घेणे.
२. फोडणीत राई (मोहरी), जिरे, असेल तर कांदा चिरुन परतणे. गवारीत कांदा घालायचा नाही.
३. भाजी घालून थोडेसे पाणी घालून परतणे.
४. झाकण ठेवून बारीक गॅसवर १०-१५ मिनिटे शिजवणे.
५. मग तिखट, मीठ, गूळ किंवा साखर, थोडासा धणे/जिरे मसाला किंवा गोडा मसाला टाकून थोडे-थोडे पाणी घालत शिजवणे. भाजी सुकी वाटली/करपत आहे असे वाटले तर पुन्हा थोडे पाणी घालून शिजवणे.

टीप:
घाईच असेल तर फोडणीत शेंगाच्या भाज्या घालून १/२(अर्धा) ते १ कप पाणी घालून pressure - pan मध्ये २-३ शिट्या करणे. 

वांगी, बटाटा, टोमॅटो रस्सा भाजी

साहित्य:

३ माणसांना साधारण ३ बटाटे, २ वांगी, १ टोमॅटो
तेल
कांदा
मोहरी
जिरे
गोडा मसाला
मीठ
तिखट

साहित्य:

१. कढईमध्ये तेल गरम करुन त्यात मोहरी, जिरे, असल्यास कांदा टाकून थोडा वेळ परता.
२. मग बटाटा, वांग्याच्या फोडी टाकून झाकण ठेवून परतावे.
३. टोमॅटो, मीठ टाकून झाकण ठेवून शिजवावे.
४. नंतर गोडा मसाला, तिखट घालावे.
५. १-२ वाट्या पाणी घालून उकळावे.

टीप:
१. हवा असेल तर फ्लॉवर घालू शकता.
२. सुकी भाजी हवी असेल तर पाणी जास्त घालू नये. 

कांद्याची भाजी

साहित्य:

कांदा - २-३
तिखट
मीठ
हळद
बेसन
मोहरी
जिरे
साखर

कृती:

१. कांदा उभा चिरणे. त्यात तिखट, मीठ, हळद, थोडे सुके बेसन पीठ(optional) मिक्स करणे.
२. फोडणीत मोहरी, जिरे घालून वरील mixture टाकावे व झाकण ठेवून ३-४ वेळा बारीक गॅसवर शिजवावे. चवीनुसार आवडत असेल तर साखर घालावी.
३. पीठ लावायचे नसेल तर त्यात थोडा गोड मसाला टाकावा.

टीप:
१. सिमला मिरची/ कांदापात वरील प्रमाणेच पीठ लावून करु शकतो. फक्त पीठ भाजी थोडी शिजल्यावर लावावे. 

आमटी

साहित्य:

डाळ - तूर/मसूर/उडीद/मूग - ३ जणांसाठी साधारण १/२(half) वाटी
तेल
मोहरी
जिरे
हिंग
हिरवी मिरची - २/३
कडीपत्ता - ८/१० पाने
हळद
आमसुले - २/३
गूळ - छोटासा १-२ इंच खडा
गोडा मसाला
मीठ
कोथिंबीर

कृती :
१. १-२ चमचे तेल कढईमध्ये गरम करावे.
२. फोडणीत मोहरी, जिरे, हिंग, हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे, बारीक चिरलेला कडीपत्ता, हळद घालावी.
३. थोडे परतून झाल्यावर डाळ घालावी. दुप्पट पाणी घालावे.
४. त्यात आमसुले, गूळ, मीठ, गोडा मसाला घालावा आणि ५-१० मिनिटे उकळावी.
५. बारीक चिरलेली कोथिंबीर वरून घालावी.

टीप:
१. वरणासाठी ३ जणांसाठी १ वाटी डाळ लागते.
२. आवडत असेल तर फोडणीमध्ये डाळ घालण्याआधी बारीक कांदा परतायचा. मग टोमॅटो घालून परतायचा आणि मग डाळ वगैरे घालावी.

Wednesday, September 28, 2016

बटाटे भाजी

साहित्य:

बटाटे - १ माणसाला २ मध्यम
तेल
मोहरी
हिंग
उडीद डाळ
मिरची
कडीपत्ता
हळद
मीठ
साखर

काचऱ्या :

१. बटाटे धुवून सोलायचे आणि मग काचऱ्यांप्रमाणे पातळ चिरायचे आणि पाण्यात घालायचे.
२. कढईत तेल टाकायचे. मोहरी, हिंग, उडीद डाळ, मिरची/कडीपत्ता बारीक चिरुन घालायचा.
३. हळद टाकून लगेच बटाट्याच्या फोडी घालायच्या(पाणी काढून). २-३ वेळा झाकण घालून परताव्या.
४. मग मीठ, किंचित साखर घालायची. असेल तर वरुन कोथिंबीर-खोबरे घालावे.

उकडलेली भाजी:

१. उकडलेले बटाटे गार करून घ्यावे आणि मध्यम आकाराच्या फोडी कराव्या.
२. मग फोडणीमध्ये वरील प्रमाणे असेल तर थोडे आले कुटून घाला.
३. असेल तर कांदा टाकून परता आणि नंतर बटाटे घालून परतावे.
४. मीठ, साखर घालावी आणि परतून झाल्यावर कोथिंबीर- खोबरे घालावे. 

आईच्या काही साध्या टिप्स

१. रवा आणल्याबरोबर लगेच न विसरता फ्रीजमध्ये टाकावा व लागेल तसा वापरून उरलेला रवा परत पुडीला रबर बांधून तो फ्रीजमध्ये ठेवावा किंवा आणल्याबरोबर तो कढईत जरासा गरम करून मग भरून ठेवावा.
२. कणीक तेल, मीठ घालून जरा जास्तच भिजवून ठेवावी म्हणजे आयत्यावेळी पोळ्या करायला सोपे जाते.
३. पुऱ्यांची कणीक थोडी जास्त घट्ट भिजव.
४. कडधान्ये - मूग, मटकी पाण्यात भिजवत ठेवावी(८-१० तास). मग मोड येण्यासाठी ती धुऊन घ्यायची. चाळणीत घालून १०-१५ तास किंवा थंडी असेल तर मोड यायला जास्त वेळ लागतो. मोड आलेली उसळ लवकर शिजते. मूग, मटकी मोड आल्यावर कुकरच्या डब्यात पाणी काढून शिजत ठेवावी आणि २-३ शिट्या कराव्यात. 
५. शेंगदाणे असतील तर ते OVEN मध्ये किंवा कढईत चांगले भाजून ठेवावे म्हणजे अधे मधे खायला मिळतात आणि जर कूट करायचे असेल तर न सोलता कूट केले तरी चालते. 
६. दूध जास्त असेल तर थोडी जास्त अशी रवा, शेवयांची खीर करून ठेवावी. रवा जराश्या तुपात लालसर भाजून घ्यावा व मग गरम दुधात टाकावा. एवरेस्ट मसाला/वेलची आणि साखर अंदाजाने  घालावी. १ लिटर दूध - पाव वाटी भाजलेला रवा/शेवया टाकून उकळावे. जास्त रवा / शेवया एकदम टाकू नये. उकळल्यावर त्या फुगतात आणि खीर घट्ट होते. पातळ खीर वाटली तर आणखी घालता येतात. 
७. बटाटे उकाडायचे असतील तर ते धुवून घ्यायचे आणि तसेच ओलसर बटाटे कुकरच्या डब्ब्यात ठेवून ३-४ शिट्ट्या काढायच्या. 
८. PRESSURE-PAN मध्ये २-३शिट्ट्याच करायच्या. खूप शिट्ट्या करायच्या नाहीत, अन्न जास्त शिजते आणि मग चव जाते. Pressure - pan मध्ये कोणतीही भाजी without water शिजवायची नाही (१ कप पाणी). नाहीतर भाजी करपते  व valve उडतो. छोले असतील तर ४-५ whistles कराव्या.
९. जर्मनच्या कुकरमध्ये जाळी बुडेल त्यापेक्षा थोडेसे पाणी अधिक घेणे. लिंबू वापरलेले असेल तर ते फ्रिजमध्ये आठवणीने ठेवणे आणि एखादी फोड १-२ दिवसांआड कुकरच्या डब्यांच्या खाली जाळीमध्येच आठवणीने टाकावी म्हणजे कुकर एकदम पांढरा स्वच्छ राहतो.
१०. Marketला गेल्यावर आलं, मिरच्या, कोथिंबीर, पुदिना, कडीपत्ता, लिंबू आणणे. त्यापैकी जास्तीत जास्त गोष्टी नेहमी फ्रीजमध्ये सर्व separate bags मध्ये ठेवणे. वरील सर्व गोष्टी अगदी आयत्या वेळी धुणे.
११. साधारण वरण भात कुकर मध्ये लावायचा असेल तर ३-४ शिट्टया झाल्यावर ३-४ मिनिटे गॅस बारीक करून ठेवावा, म्हणजे भात छान मऊ शिजतो.
१२. १ माणसाला १ मूठ डाळ आमटीसाठी लागते. वरणासाठी १ माणसाला २ मोठी डाळ पुरे होते.
१३. ADDITIONAL पोळ्या असतील तर १ माणसाला अर्धा ते १ मूठ तांदूळ पुरतात. पोळ्या नसतील तर तांदूळ जरासे जास्त घालावे.
१४. १ वाटी पिठाच्या २-३ पोळ्या होतात.
१५. थालीपीठ- थालीपीठाची भाजणी असेल तर त्यात गरम पाणी घालावे आणि थालीपीठाची भाजणी नसेल तर घरातली कोणतीही पीठे mix करून ती गार पाण्यानेच पीठ भिजवावे. सुक्या पीठामध्येच अंदाजाने तिखट, मीठ, हळद, कांदा चिरून घालावे मग पाणी घालून खूप मळावे.
१६. कोशिंबीर - कोणत्याही कोशिंबिरीत दही घालायचे असेल तर अगदी आयत्यावेळी घालायचे नाहीतर पाणी सुटते.
१७. भाज्या (सोप्या व combination मध्ये)

  1. बटाटे + सिमला मिरची 
  2. कांदा + बटाटे + टोमॅटो 
  3. कांदा + वांगी + बटाटे 
  4. भेंडी (भेंडी धुतल्यावर कधीही लगेच चिरायची नाही, ती सुकीच असली पाहिजे. घाई असेल तर टॉवेलने चांगली पुसून घ्यावी.)
  5. कांदा + टोमॅटो + भेंडी 
  6. कांदा + (फरसबी/चवळी)
  7. उसळी - उसळी mostly कांदा परतून मग उकडलेली कडधान्ये टाकावी म्हणजे चव चांगली लागते. त्यात लाल तिखट + मीठ + थोडा धने जिरे मसाला/धने पावडर/गोड मसाला + गूळ घालावा. 
  8. फ्लॉवर + बटाटे + टोमॅटो. (आलं ठेचून घालणे)
  9. कांदा + बटाटे (काचऱ्यांप्रमाणे चिरून )
  10. कांदा + मेथी + बटाटे (ह्या भाजीत चव पाहून त्याप्रमाणे आवडत असेल तर साखर टाकावी.)
  11. बटाटे + पालक (उकडून)
  12. पालक पनीर
  13. कांदा + टोमॅटो + आले लसूण paste optional + सर्व mix भाज्या ( गाजर+ फरसबी + फ्लॉवर + कोबी) जे available आहे त्याप्रमाणे + कोणताही मसाला थोडा रस ठेवून आटवावे म्हणजे चव चांगली येते. 
१८. पराठा: कणीक + थोडासा ओवा (otherwise जिरे) + मीठ + थोडेसे तिखट + थोडे तेल घालून पीठ भिजवावे. खूप मळावे व जाडसर छोटीशी पोळी लाटावी. तव्यावर तेल टाकून चांगली परतावी. 
१९. मोड आलेल्या कडधान्यांत ते २-३ शिट्ट्या उकडून त्यात मीठ, चाट मसाला, जिरे पावडर, थोडेसे तिखट, दही मिक्स करणे. 
२०. आलू चाट: ४ बटाटे उकडून फोडी करायच्या. मग हिरवी मिरची + किंचित (पाव इंच) आले + पुदिना + कोथिंबीर पेस्ट करणे (जाडसर paste). ती मीठ लावून बटाट्यांना चोळणे. 



Tuesday, January 12, 2016

गुळाच्या पोळ्या

साहित्य :

सारण :

१/२ किलो गूळ
२ वाटया तीळ
४-५ tbsp खसखस
१ वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस
१/२ वाटी तेल
१ वाटी बेसन
वेलची पूड

आवरण :

२ वाटी कणिक
२-३ चमचे तेल
चिमूटभर मीठ

कृती :

१. तीळ, खोबरे आणि खसखस वेगवेगळे मंद गॅसवर भाजून घ्यावे. भाजल्यावर तीळाची चव बदलते, म्हणजे नीट भाजले आहेत की नाही ते समजेल आणि खसखस लवकर जळते म्हणून सावकाश लक्ष ठेवून भाजावी. खोबरे सोनेरी रंग येईपर्यंत भाजावे. वेगवेगळे मिक्सर मधून काढून घ्यावेत. (खोबरे आणि तीळ एकत्र करून मिक्सर मधे घालु शकतो आणि खसखस वेगळी.)
२. बेसन तेलावर भाजून घ्यावे, रंग बदलेपर्यंत भाजावे, म्हणजे कच्चे लागणार नाही.
३. गूळामधे हे सगळे पदार्थ एकत्र करायचे आहेत. त्यासाठी गूळ भांड्यात घालून कुकरमध्ये ४ शिट्ट्या कराव्यात. गूळ पाझरतो आणि पातळ होतो. गरम असतानाच त्यामध्ये वरील पदार्थ घालवेत आणि मिश्रण एकत्र करावे. वेलची पूड घालून नीट एकत्र करावे.
४. तेल कड़क गरम करून त्याचे मोहन कणकेत घालावे आणि पीठ घट्टसर मळून घ्यावे. पोळ्या करायच्या साधारण १-२ तास आधी पीठ मळून झाकून ठेवावे. मध्यम घट्ट भिजवावे.
५. दोन साधारण सारख्या मापाचे १'' कणकेचे गोळे घ्यावेत. त्यांच्या छोट्या लाट्या करून घ्याव्यात. एका लाटीवर सारण भरून दुसऱ्या लाटीने बंद करावे. हलक्या हाताने एकाच बाजूने लाटावे, जेणेकरून मिश्रण पोळीच्या कडांपर्यंत लागेल.
५. मध्यम गॅसवर दोन्ही बाजूंनी पोळी भाजावी. कधी कधी गूळ फसफसतो पण काळजीपूर्वक परतावी. गार झाल्यावर तूपाबरोबर खावी.

टीप:
१. तीळाचे प्रमाण कमी-जास्त करू शकतो. कमी तीळ घातले तर गूळ जास्त पाझरतो आणि थोड़े पोळ्या बनवतांना चिकटतो.
२. सारण आधी बनवून ठेवले तरी चालते आणि अगदी महिनाभर देखील नीट राहते, no refridgeration needed.
३. सारणामध्ये नंतर गूळ वाढवायचा असेल तर किसून घालवा.
४. खमंगपणा कमी वाटत असेल तर तीळ भाजून मिक्सरमध्ये घालून बारीक़ करून घालावेत.
५. पोळ्यांच्या कणकेत मैदा आणि बेसन देखील घालू शकतो. पोळ्या अजून खुसखुशीत होतात. २ चमचे बेसन/१/२ वाटी मैदा साधारण १ वाटी कणकेसाठी लागेल.
६. जर सारण पोळीच्या कडांपर्यंत गेले नसेल, तर लाटून झाल्यावर कातणाने बाहेरील पोळी कापून टाकावी.